शनिवार, १० मार्च, २०१८

मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली - एक बोधकथा !


ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.


एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
म्हणजे 
"हाही क्षण निघून जाईल" 

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले, 
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.

... ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७मंगेश पाडगांवकरांची गत वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता.

" सरणारे वर्ष मी "


मी उद्या असणार नाही 
असेल कोणी दूसरे 
मित्रहो सदैव राहो 
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले 
किंवा काही वाईटही 
मी माझे काम केले 
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु 
तुमची माझी नाळ आहे 
भले होओ , बुरे होओ 
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु 
आणि दोषही देऊ नका 
निरोप माझा घेताना 
गेट पर्यन्त ही येऊ नका

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली 
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला 
तुम्ही मला खुशाल विसरा 
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही 
मी माझे काम केले 
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणनार नाही 
" वचन " हे कसे देऊ 
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

दोन शब्द जगण्याविषयी

दोन शब्द जगण्याविषयी

कुणाला आपला कंटाळा येईल 
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी 
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

कारण
जीवनाच्या वाटेवर 
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... माणसं !

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... माणसं !

वेडं लावतात, 
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... माणसं !

पाठीशी असतात, 
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात , 
वाट लावतात
ती ही असतात..... माणसं !

शब्द पाळतात, 
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात, 
गळा कापतात
ती ही असतात ...... माणसं !

दूर राहतात, 
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील, 
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... माणसं !

नाना प्रकारची अशी 
नाना माणसं,
ओळखायची कशी 
सारी असतात आपलीच माणसं !